चांगल्या पर्जन्यमानाची शेतकर्यांना आशा
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 3431 मिमी
आतापर्यंत 829 मि.मी. पावसाची नोंद
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेली धरणे आणि पाझर तलाव हे 2020 च्या पावसाळ्यात पूर्ण क्षणतेने भरली नव्हती. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे भरली नव्हती, पण यावर्षी तरी जलाशयाच्या परिसरात चांगले पर्जन्य होऊन धरणे ओव्हर फ्लो होतील का? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यात सरासरी 3431 मि.मी. इतका पाऊस होतो. अद्यापपर्यंत 829 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील काळात चांगला पाऊस होऊन जलाशये ओव्हरफ्लो होतील, अशी आशा शेतकर्यांना आहे.
कर्जत या कृषीप्रधान तालुक्यात भाताची शेती येथील 90 टक्के परिसरात केली जात होती. त्यामुळे उन्हाळ्यात देखील भाताची शेती करता यावी यासाठी शासनाने तब्बल तीन लघुपाटबंधारे प्रकल्प कर्जत तालुक्यात साकारले.तर रायगड जिल्हा परिषदेने सहा ठिकाणी पाझर तलावांची निर्मिती केली. शेतीला पाणी मिळावे आणि शेतकरी सधन व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने बांधलेले सहा पाझर तलावांपैकी केवळ दोनच पाझर तलाव 2020च्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहिले. अन्य पाझर तलाव परिसरात आणि एकूण कर्जत तालुक्यात पूर्ण क्षमतेने पाऊस झाला नसल्याने खांडपे, डोंगरपाडा-पाथरज, सोलणपाडा-जामरुंग आणि साळोख तर्फे वरेडी येथील पाझर तलाव हे ओव्हर फ्लो झाले नाहीत. कशेळे, किकवी आणि खांडस येथील पाझर तलाव हे 2020 च्या पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाले. मात्र, त्या पाझर तलावांचे पाणी साठवण क्षेत्र हे माती आणि दगड यांच्यामुळे कमी झाल्याने ते दोन पाझर तलाव हे ओव्हर फ्लो झाले.
कर्जत तालुक्यातील पावसाचे सरासरी पर्जन्यमान हे 3431 मिलिमीटर एवढे आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील 2020 च्या पावसाळ्यात जेमतेम 2800 मिली एवढा अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी साठवण करून ठेवण्यासाठी बांधलेले पाझर तलाव हे पूर्ण क्षमनेते भरले नाहीत. त्याचवेळी तालुक्यातील तीन वेगवेगळ्या भागात असलेले राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने निर्माण केलेले लघुपाटबंधारे प्रकल्प हे देखील गतवर्षी कमी पर्जन्य झाल्याने भरले नाहीत. नेरळ-कळंब रस्त्यावर अवसरे येथे असलेले धरण हे निम्मे देखील भरले नव्हते. तर रायगड जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेले पाषाणे येथील धरणदेखील ओव्हर फ्लो झाले नाही.त्याचवेळी नेरळ-कर्जत रेल्वे मार्गातील 1100 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधलेले पाली-भूतीवली धरणदेखील भरले नाही. त्यामुळे यातील पाषाणे आणि अवसरे या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांना शेतीसाठी योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही.
यावर्षी 2021 मध्ये पावसाने जून महिन्यापासून चांगला जोर धरला असून, आतापर्यंत 829 मिली पाऊस झाला आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील सर्व जलाशय हे पूर्ण क्षमतेने भरलेले असतील, असा आशावाद शेतकर्यांना आहे.
यावर्षी चांगला पाऊस होण्याचे अनुमान असून सर्व धरणे आणि पाझर तलाव पाण्याने भरतील अशी शक्यता आहे.पाऊस कमी झाल्याने पाझर तलावात आवश्यक पाणी साठा डेड म्हणून ठेवायचा असल्याने शेतीसाठी पाणी सोडताना अडचणी आल्या होत्या.मात्र यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा करू या.
सुरेश इंगळे, उपअभियंता, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने दुबार शेतीसाठी पाणी सोडताना अधिकारी वर्गाला सारख्या विनवण्या कराव्या लागत होत्या.यंदा चांगला पाऊस होवो आणि धरणे भरून जावोत.
मंगेश सावंत-शेतकरी, सोलनपाडा