। पुणे । वृत्तसंस्था ।
क्राऊड फंडिंग म्हणजेच लोकवर्गणीमधून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता वेदिकाचा श्वास अचानक कोंडला. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजार झाला. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपये जमा केले होते. याच पैशांमधून तिला जून महिन्यात 16 कोटींचं इजेक्शन देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर महिन्याभरातच वेदिकाचा मृत्यू झाल्याने पिपंरी-चिंचवडवर शोककळा पसरलीय.
वेदिकाला झालेला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा एक जनुकीय आजार आहे. हा आजार आपल्या मुलीला झाल्याचे समजल्यानंतर तिचे आई वडील सुरुवातीला खचून गेले. मात्र त्यांनी हिंमत न हारता वेदिकावरील उपाचारांसाठी पैसे उभे करण्याचं ठरवलं. त्यांनी एक दोन नाही तर तब्बल 16 कोटींचा निधी जमा केला. क्राऊड फंडिंगमधून एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसा गोळा केल्यानंतर वेदिकाला या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं झोलगेन्स्मा नावाचं 16 कोटींचं इंजेक्शन एका खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही या आजाराने वेदिकाचा जीव घेतलाच.