। उरण । वार्ताहर ।
सारडे विकास मंचने दिलेल्या एक कुटुंब, एक झाड या आवाहानाला सर्व क्षेत्रातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेला प्रतिसाद एवढा मोठा होता की झाड लावण्यासाठी खोदलेले खड्डे कमी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सारडे विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी एक आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक मोठमोठ्या व्यक्तीमत्वांपासून ते लहान बालगोपालांनीं सुद्धा ह्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद देत कुणी आपल्या जन्मदिनाच औचित्य साधत, तर कुणी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तर कुणी निसर्गसंवर्धनाच्या या मोहिमेत वृक्षदान केले. खरं तर आमचा खड्डा तुमचे झाडं या संकल्पनेत झाडे लागवडी करीता खोदलेले खड्डे कमी पडायला लागल्यामुळे अक्षरशः आणखी नवीन खड्डे खोदायला लागले.
यावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, अतिश पाटील मराठी, हिंदी क्रिकेट समालोचक पागोटे, प्रसाद पाटील माजी सरपंच वशेणी, रविंद्र पाटील, निवास गावंडे, विलास पाटील, संतोष खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.