खरिपाच्या पेरणीच्या कामांना वेग


। माणगांव । प्रतिनिधी ।
पावसाळा जवळ आल्याने तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामात शेताचे बांधबंधिस्ती करणे, शेताचे कोपरे साफ करणे,आजूबाजूचे गवत काटे साफ करणे यासारखी शेतीची कामे पूर्ण होत असून धूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दक्षिण रायगडमध्ये मोठ्याप्रमाणात धूळ वाफेची पेरणी केली जाते. रोहिणी नक्षत्रा नंतर पेरणीची कामे सुरू होतात. यावर्षी अवकाळी पाऊस, बदलते हवामान यांमुळे शेतकर्‍यांनी मे महिन्यात पेरणी न करता जूनच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त साधत पेरणीच्या कामांना गती दिली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजनुसार केरळमध्ये मान्सून पाऊस दाखल झाला असून 10 जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

तालुक्यातील पेरणीची कामे सुरू झाली आहेत. पुढील दोन चार दिवसांत पेरणीची कामे पूर्ण होतील. तालुक्यात 12 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड केली जाते तर एक हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे.
कृष्णा शिंदे, कृषी सहाय्यक अधिकारी, माणगाव.

पाऊस जवळ आल्याने उरलेल्या काही दिवसात पेरणीची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. या वर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे वेधशाळेने दिलेला अंदाज व हवामानातील सुखद बदल यामुळे पेरणीची कामे सुरू केली आहेत.
सीताराम पोटले, शेतकरी, माणगाव.

Exit mobile version