गावातील मुलींच्या शिक्षणाला मिळणार गती

चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन


| अलिबाग | प्रतिनिधी |

शेकाप कष्टकरी, शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या पाठीशी कायम राहिला आहे.त्यात मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्यामध्ये शेकाप आघाडीवर राहिला आहे. गावातील मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी आतापर्यंत 25 हजारहून अधिक मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी सुविधा नसल्याने अनेक मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते. परंतु, आता त्यांच्या शिक्षणाला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.

नवेदर बेली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप शिबीर तसेच शाळकरी मुलींना सायकल वितरण सोहळा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ( दि.9) फेब्रुवारी रोजी झाला.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, द्वारकानाथ नाईक, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच जयेंद्र पाटील, दिपक राऊत, अलका साळावकर, के.डी. पाटील, मंगेश पाटील, परशुराम पाटील, माजी सरपंच राजाराम राऊत, निलिमा राऊत, रविंद्र पाटील, रमेश नाईक, चंद्रकांत वाडेकर, प्रतिक पाटील, मनोज पाटील, सुबोध पाटील, महेंद्र नाईक, समिक्षा पाटील, शांताराम पाटील, रंजीत राऊत, अमोल नाईक आदी मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थीनी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना, चित्रलेखा पाटील म्हणाल्या, शिक्षण हा प्रगतीचा खरा पाया आहे. गावातील गोरगरीबांसाठी शिक्षणाचे दारे खुली व्हावीत यासाठी शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी काम केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलींच्या शिक्षणावर भर देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम सुरु केला आहे.मुलींना गावापासून शाळा, महाविद्यालयापर्यंत जाताना अनेक अडचणी येतात.त्यामुळे अनेक मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. हा खंड पडू नये म्हणून मुलींसाठी सायकल देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून अनेक मुलींना सायकलचा आधार मिळाल्याचा आनंद आहे. शासनाच्या पलिकडे एक पाऊल पुढे टाकत हा कार्यक्रम सुरु केला आहे. गावांतील गोरगरीबांची घरे चांगली असावीत यासाठी ‌‘ताईची सावली’ या नावाने आपण घरकुल योजना राबवित आहोत. दोन हजार घरकुल देण्याचा संकल्प असून सध्या प्रायोगिक तत्वावर वीस घरकुल आपल्या पुढाकारातून मंजूर केले आहेत, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

सायकलचा आधार मुलींसाठी ठरणार वरदान
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मुलींसाठी सायकल देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. आतापर्यंत 25 हजार मुलींना सायकल देण्यात आल्या आहेत.नवेदर बेली,ढवर येथील शाळकरी तीस मुलींना शुक्रवारी सायकली देण्यात आल्या. शिक्षणाच्या दृष्टीने सायकलचा आधार मुलींसाठी वरदान ठरणार आहे.

चित्रलेखा पाटील यांचे काम प्रेरणादायी
महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील एक वेगळ्या पद्धतीने काम करीत आहेत. एक प्रेरणा देणारे काम त्यांच्याकडून होत आहे. मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम खूप चांगला आहे.शाळा महाविद्यालयात जाताना पायपीट करावी लागत आहे. ही पायपीट चित्रलेखा पाटील यांनी सायकल देऊन थांबवली आहे. जिल्हा परिषदेवर दोन वर्ष प्रशासक आहे. निधी नसतानादेखील शेकापच्या माध्यमातून अनेक कामे केली जातात. या गावांचा विकास शेकाप माध्यमातून झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांनी केले.

250 हून अधिक जणांना मोफत चष्मे
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चष्मे विकत घेणे परवडत नाही. अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नेत्र चिकित्सा व चष्मा वाटप शिबीर शुक्रवारी घेण्यात आले. या शिबीराला ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांकडूनदेखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 250हून अधिक लाभार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते चष्मे वाटप केले.

Exit mobile version