माणगावमध्ये काळ्या भाताच्या वाणाचे वाटप


। माणगाव । प्रतिनिधी ।
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग व प्रकल्प संचालक आत्मा रायगड अलिबाग यांच्या प्रयत्नातून माणगाव तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यामध्ये काळा भाताचे बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस भात शेती परवडत नाही म्हणून भात शेती क्षेत्र कमी होत आहे, यावरती एक पर्याय म्हणून बाजारात जास्त पैशाने मागणी असलेला काळा व लाल भाताचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत चालू वर्षी माणगाव तालुक्यात 15 किलो काळ्या भाताचे बियाणे उपलब्ध झाले असून सदरचे बियाणे तालुक्यातील मांजुरने, बोर्ले, बामणोली, साजे, कोस्ते या गावातील प्रगतशील शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर शेतकर्‍याकडून पुढील वर्षी पाचपट काळा भाताचे बियाणे गोळा करून इतर शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या प्रकारे काळा व लाल भाताचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. उत्पादित लाल व काळा तांदूळ कृषि विभागाचे विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून विक्रीचे नियोजन करून देण्यात येणार आहे.

Exit mobile version