अक्षय्य तृतीयेसाठी आंबा बाजार बहरला!

पुणे

 । पुणे । वृत्तसंस्था ।

 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला आंबा पूजन करून पूर्वजांना नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक डझन हापूस आंब्यांची विक्री 300 ते 700 रुपये दराने केली जात आहे. यामध्ये कर्नाटक आणि रत्नागिरी हापूसचा समावेश आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा बाजारात रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग परिसरातून हापूस आंब्यांची आवक होत आहे. फळबाजारात  तीन ते साडेतीन हजार हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली. कच्च्या हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार एक ते अडीच हजार रुपये तसेच पाच ते दहा डझनाच्या पेटीला दीड हजार ते चार हजार रुपये असा भाव मिळाला आहे. प्रतवारीनुसार चार ते सहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दीड ते तीन हजार रुपये आणि पाच ते दहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दोन ते पाच हजार हजार रुपये दराने विक्री करण्यात आली.मार्केट यार्डसह महात्मा फुले मंडईतील बाजारात आंबा खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. किरकोळ आंबा विक्रेत्यांनी शनिपार, मंडई परिसरात तात्पुरती दुकाने थाटली आहेत. निर्बंधामुळे आंबा खरेदीवर काहीसा परिणाम झाला असल्याची माहिती किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी दिली.अक्षय्य तृतीयेला आंब्यांना चांगली मागणी असते. मात्र, निर्बंधामुळे मागणी काहीशी कमी झाली आहे. आवक जास्त झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचे दर कमी झाले आहेत.

Exit mobile version