अजितदादा तोंड सांभाळून बोला

मुंबई | प्रतिनिधी |

ज्या भाजपासोबत आपण तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर प्रहार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केंद्रात दुसर्‍यांदा सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने रविवारी (30 मे) कोल्हापूर येथे करोोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं.

अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

अजित पवारांना कुणीही तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या सर्व मागण्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. पण केवळ कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. राज्यात सगळं सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको. शांत बसा, हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील, तर भाजपा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

Exit mobile version