द्रोणागिरी, कामोठे ते विमानतळालगतच्या परिसरात सलग कारवाई
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली असून, द्रोणागिरी, कामोठे, तरघर ते उलवे प्रवेश पूल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या परिसरात सिडकोने सलग पाडकाम मोहीम राबविली.
या कारवाईत पक्की बांधकामे, गॅरेज, ढाबा, दुकाने, स्टॉलसह रस्ते आणि पदपथांवरील सुमारे 50 टपऱ्या हटविण्यात आल्या. अनधिकृत वाहनतळांवरही कारवाई करून अवजड वाहने भूखंडाबाहेर काढण्यात आली. या कारवाईत पक्की बांधकामे, गॅरेज, ढाबा, दुकाने, स्टॉलसह रस्ते आणि पदपथांवरील सुमारे 50 टपऱ्या हटविण्यात आल्या. अनधिकृत वाहनतळांवरही कारवाई करून अवजड वाहने भूखंडाबाहेर काढण्यात आली.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 5 ऑगस्ट रोजी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर एक, भूखंड क्रमांक 59 येथे कारवाई केली. या ठिकाणचे सुमारे 70 चौरस मीटर क्षेत्रफळाचे पक्के वीट बांधकाम, पत्र्याच्या शेडमधील गॅरेज आणि ट्रक पार्किंग हटविण्यात आले. त्याचबरोबर सेक्टर 47 आणि 50 मधील रस्ते व पदपथांवरील 40 ते 50 कच्च्या-पक्क्या टपऱ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. कामोठे नोडमध्येही त्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. सेक्टर 24 मधील भूखंड क्रमांक 16 लगतच्या जागेवर अनधिकृतपणे उभी करण्यात आलेली अवजड वाहने टोईंग करून बाहेर काढण्यात आली. या भूखंडावरील एक गॅरेज आणि टायरचे दुकान पाडण्यात आले.
सेक्टर 22 मधील भूखंड क्रमांक 39 आणि 39 ए वरील सहा अनधिकृत स्टॉल हटविण्यात आले. सेक्टर 31 मध्ये सुमारे 500 चौरस मीटर जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत ढाब्यावरही सिडकोने बुलडोझर चालविला. यापूर्वी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी तरघर ते उलवे प्रवेश पूल तसेच तरघर रेल्वे स्थानकाजवळील आम्र मार्ग परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली होती. या भागातील अतिक्रमणे सर्व्हिस रोड आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत असल्याने ती हटविण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले.
सिडकोची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच प्रचलित नियम आणि धोरणांचे उल्लंघन करून ही बांधकामे उभारण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सिडको मंडळाचे दक्षता विभागाचे प्रमुख सूरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे काम सुरू आहे. आतापर्यंत अतिक्रमण विभागाने 11 हजार कोटी रूपयांची जागा मोकळी करून सिडकोच्या ताब्यात घेतली आहे. मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई नवी मुंबई व पनवेल उरण येथे जोरदार सुरू आहे. सिडकोचा अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, महावितरणचे कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते. कारवाईसाठी जेसीबी, ट्रक, गॅस कटर आणि मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.
