। मुंबई । प्रतिनिधी ।
इस्त्रायल-अमेरिकेने छेडलेल्या युद्धात प्रतिकार करणाऱ्या इराणने ओमानमध्ये अमेरिकी लष्करी तळांवर चढवलेल्या ड्रोन हल्ल्यांत तेलवाहू जहाजावर काम करणारा कांदिवलीचा दीक्षित सोलंकी (25) याचा मृत्यू झाला. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ, गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर इराणचा हा ड्रोन हल्ला झाला. त्याच्या तडाख्यात दीक्षितचे जहाज सापडले.मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ऑईल टँकरवर तो क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर या टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा हल्ला झाला. या हल्ल्यात टँकरच्या इंजिन
रूममध्ये भीषण स्फोट होऊन दीक्षितचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी विभागातील आपत्कालीन विभागाने दिली. दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. तो काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता. आणि कांदिवलीत वास्तव्याला होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कर्तव्याला परतला होता.





