संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सुचना
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका प्रभागातील नागरिक विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत. त्यात स्मशानभूमी, सांडपाणी वाहिनी तसेच विभागातील रस्ते अशा अनेक गंभीर समस्या आहेत. यादरम्यान, पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे निरसण करण्यासाठी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत सुचना देखील केल्या.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेत अरविंद म्हात्रे यांनी पाहणी दौऱ्याची सुरूवात तळोजा येथून केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी पेठगाव येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी खारघर सेक्टर 36 येथे नव्याने सुरू झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या दवाखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या दवाखान्यामध्ये डायलेसिसची सुविधा, एक्स-रे मशीन, डॉक्टरांची संख्या वाढवणे याबाबत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी यांना सूचना केली. पुढे त्यांनी रोहिंजन येथील जीर्ण झालेल्या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर घोट येथीलल घनकचरा विभागाला भेट दिली. येथील कचरा रात्रीच्या वेळेस जाळण्यात येतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि हा प्रकारा बंद करण्याच्या सुचना केल्या. पुढे पाले खुर्द या गावाला भेट देत असताना येथील जीर्ण झालेली स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्याचवेळी देवीचा पाड या ठिकाणी येथील आशा वर्करने अरविंद म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अरविंद म्हात्रे यांना आपल्या मानधनाबाबत निवेदन दिले. यावेळी अरविंद मात्रे यांनी, आपण याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करू आणि हा विषय पालिकेच्या मासिक सभेमध्ये घेऊन याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह नगरसेवक राम पाटील, नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेविका प्रगती कैलास पाटील, नगरसेविका लीला कातकरी, नगरसेविका योगिता फडके, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी अरविंद म्हात्रे, आणि महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






