| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता अचानक अवकाळी पाऊस बरसू लागल्याने, बहरु लागलेले वाल, चवळी, हरभरा, मुगाची कडधान्य व भाजीपाला पिके त्याचबरोबर आंबा पीकेही धोक्यात आली आहेत.
तालुक्यातील वीटभट्टी कारखान्यांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. थंडीच्या सुरुवातीला कडधान्य, भाजीपाला पिकांसाठी तसेच आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे, आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे आला होता. कडधान्य पिकेही बहरू लागली होती. तसेच येथील फळबागा कैऱ्या धरण्याच्या स्थितीत असताना, अचानक वातावरणात बदल होऊन अवेळी पाऊस बरसल्यामुळे मोहोर काळवंडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कैऱ्याही गळून पडतील असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आंब्याप्रमाणेच कडधान्य व भाजीपाला पिकांवरही या अवेळी पावसाचा चांगलाच परिणाम होण्याची भीती बागायतदार व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेवग्याच्या झाडांना यावर्षी चांगल्या प्रकारे मोहोर व शेंगाही आलेल्या असताना, ढगाळ वातावरणामुळे हा मोहोर गळू लागला आहे. वाल, चवळी, हरभरा, तुर, मुग, पावटा, घेवडा, वांगी, कलिंगड, व अन्य पिकांवर या अवेळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.







