। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।
भारतीय टेनिसपटू जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय जोडीने ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युएल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन जोडीवर मात करत एकत्र खेळताना पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले. साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर 11-9, 4-11, 11-9, 11-6 अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसर्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला. मात्र, त्यांना योग्य वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले. त्यांनी तिसरा आणि चौथा असे सलग दोन गेम जिंकत सामन्यात बाजी मारली. “पुरुष दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही माझी वैयक्तिक पहिलीच वेळ होती. तसेच हरमीतसोबत खेळतानाही आमचे हे पहिले जेतेपद ठरले. आम्ही दीर्घ कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सुवर्णपदक पटकावणे ही समाधानकारक बाब आहे,’’ असे साथियन म्हणाला. तसेच त्याने या यशाचे श्रेय त्याचा साथीदार हरमीतला दिले. साथियन-हरमीतने उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अॅडम झुडी जोडीला पराभूत केले होते.