। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल विद्या संकुलात 20 व 21 डिसेंबर रोजी वाक् स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे कोकण एज्युकेशन सोसायटीचे ध्येय असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ज्ञानग्रहणाबरोबरच वक्तृत्व, गीत गायन, निबंध, हस्तार्क्ष, टाचन वही व चित्रकला अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी सोसायटी सातत्याने प्रयत्नशील असते. या वर्षापासून नृत्य स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या असून संस्थेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून दरवर्षी प्रकाशित होणार्या विकास अंकाच्या ‘मुखपृष्ठ सजावट’ स्पर्धा घेण्यात आली.
संस्थेच्या सर्व शाखांमधील गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि.21) पनवेलमधील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलात संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ संजय पाटील, संस्थेच्या कार्यवाह अॅड. पल्लवी पाटील ,ज्येष्ठ संचालक संजय पाटील, संस्थेचे संचालक मंडळ व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी, शाळा समितीचे चेअरमन मा. आमदार बाळाराम पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गावित, संकुलातील सर्व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथांग परिश्रमातून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडल्या बद्दल कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले आहे.त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, मान्यवरांच्या हस्ते गीत गायन स्पर्धेतील चारही गटातील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.तसेच बुद्धीबळ स्पर्धा, संस्थेतून दहावी आणि बारावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.