किडरोगांचा धोका वाढण्याची शक्यता
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 27) पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. अलिबाग, पेणसह इतर तालुक्यांमध्ये झालेल्या या पावसामुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे मोहर प्रक्रिया थांबण्यासह विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा या फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकरी आणि विशेषतः तरुण वर्ग फळपिकांकडे वळताना दिसत आहे. परिणामी, जिल्ह्यातील आंबा लागवडीखालील क्षेत्र सातत्याने वाढत असून, सध्या सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. यापैकी 14 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र उत्पादनक्षम असून, जिल्ह्यात 56 हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाने लांबणीवर गेल्याने मोहर प्रक्रिया उशिरा झाली होती. तरीही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फवारण्या करून पिकांची योग्य देखभाल केली. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी आंब्याला चांगला बहर आला होता, त्यामुळे शेतकरी आशावादी झाले होते. मात्र, अचानक झालेल्या पावसाने आणि त्यानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून पडलेल्या रिमझिम पावसानंतर दुपारपर्यंत अनेक भागांत ढगाळ वातावरण राहिले. या बदलत्या हवामानामुळे आंबा पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा पाऊस उशिरा थांबल्याने मोहर प्रक्रिया विलंबित झाली. मोहर येत असतानाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. किडरोगांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य फवारण्या कराव्यात.
-चंद्रकांत मोकल, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ






