सहा महिन्यांत व्यवसायात 1,262 कोटींची वाढ; 66वा वर्धापनदिन; सहकारातील विश्वासाची परंपरा कायम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सहकाराच्या माध्यमातून रायगडच्या आर्थिक विकासाला बळ देणाऱ्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 66 वर्षांचा विश्वासाचा प्रवास पूर्ण करताना विकासाची गतीही कायम ठेवली आहे. बँकेच्या 66व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बँकेच्या प्रगतीचा नवा टप्पा समोर आला असून, 30 सप्टेंबर 2026 अखेर बँकेचा व्यवसाय 8,367.57 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2026-27 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकेने 70.25 कोटी रुपयांचा ढोबळ नफा नोंदविला आहे.
सहकार, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली आपली भूमिका कायम ठेवत बदलत्या आर्थिक गरजांनुसार बँकेने विस्तारलेली सेवा आणि व्यवसायाची व्याप्ती यामुळे हा वर्धापनदिन बँकेच्या प्रगतीच्या नव्या पर्वाची नोंद करणारा ठरत आहे.
31 मार्च 2026 रोजी 7,105.14 कोटी रुपये असलेला बँकेचा व्यवसाय 11 जुलै रोजी झालेल्या 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत 8,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. सप्टेंबरअखेर बँकेने 8,367 कोटी रुपयांचा टप्पा गाठला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बँकेच्या व्यवसायात तब्बल 1,262 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
1960 मध्ये स्थापन झालेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 66 वर्षांच्या प्रवासात कृषी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत विश्वासाची भक्कम परंपरा निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे बँकिंग स्वीकारत आता 10 हजार कोटींच्या व्यवसायाच्या नव्या टप्प्याकडे बँकेची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या व्यवसायविस्ताराला अधिक गती देण्यासाठी स्वतंत्र विपणन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू करण्यात येणार असून, बदलत्या बाजारपेठेच्या गरजा आणि नव्या ग्राहकांपर्यंत बँकेच्या सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
कर्जमाफीत बँकेचा पुढाकार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या 2026 मधील अंमलबजावणीतही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी ग्राहकांना तत्पर सेवा दिली आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या यादीत बँकेच्या एकूण 7,342 पात्र सभासदांचा समावेश आहे. त्यापैकी 3,392 सभासदांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यांच्या खात्यात एकूण 20.46 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र सभासदांचेही आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी बँकेच्या शाखास्तरावर विशेष प्रयत्न सुरू असून, संबंधित शेतकरी सभासदांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जात आहे.
66 वर्षांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती ही रायगड जिल्हा बँकेची खरी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांत बदलत्या काळानुसार बँकेला नवी दिशा देत आधुनिक बँकिंग आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. आजची व्यवसायवाढ ही सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाची व एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती आहे. रायगडच्या आर्थिक विकासाला अधिक बळ देत बँकेची ही प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहील.
जयंत पाटील,
अध्यक्ष
व्यवसायवाढीसोबत ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यावर बँकेचा भर आहे. शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकरी सभासदांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी शाखास्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. बँकेच्या प्रगतीत अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचे योगदान महत्त्वाचे आहे; त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मंदार वर्तक,
मुख्य कार्यकारी अधिकारी







