आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
देशभर सुरु असलेला शेतकरी चळवल कृषीवलच्या बॅनरखालीच सुरु आहे. शेतकरी, कामगार हिताची जपणूक करणारी भुमिका कृषीवलने कायम ठेवली आहे. गरीबांच्या अन्यायाविरोधात अशीच लेखणी कायम राहू दे अशी अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
रायगडचे भाग्य विधाते स्व. प्रभाकर नारायण पाटील यांनी वाढवलेल्या कृषीवलचा सोमवार 7 जून 2021 रोजी 85 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 85 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कृषीवल च्या नवीन वेबसाईट आणि मोबाईल अॅपचे शानदार लॉन्चिंग शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते साधेपणाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यवस्थापकिय संचालिका चित्रलेखा पाटील, युवराज पाटील, मुख्य संपादक इब्राहिम अफगाण, सल्लागार संपादक प्रसाद केरकर, वेब आवृत्तीच्या प्रमुख माधवी सावंत यांच्यासह कृषीवल परिवार उपस्थित होता. यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले, वर्तमानपत्रांचा सरकारी यंत्रणेवर दबाव राहिला पाहिजे. पत्रकारांनी मॅनेज होता कामा नये. प्रत्येक बातमीची शहानिशा करुनच ती प्रसिद्ध केली पाहीजे. कोणत्याही दबावाला बळी पडता कामा नये. मग आयएसआय आयपीएस किंवा कोणतीही लॉबी असू दे. आतापर्यंत पत्रकारांच्या लेखणीद्वारे चारवेळा सत्ता उलथून टाकली आहे. इतकी ताकद लेखणीत आहे. एखाद्या बातमीमुळे मोठा बदल घडायला हवा. कृषीवल कायम गोर गरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या बाजूने उभा राहिला आहे, गरीबांवरील अन्यायाच्या विरोधात अशीच कायम लेखणी सुरु ठेवा असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी यावेळी केले.
प्रस्ताविक करताना सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी कृषीवलच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. नव्याने सुरु होत असलेल्या कृषीवलच्या वेब आवृत्ती तसेच अॅप्लीकेशन बद्दलची माहिती बेव आवृत्तीच्या प्रमुख माधवी सावंत यांनी दिली. यावेळी त्यांनी तांत्रिक बाबी देखील उलगडून सांगतानाच भविष्यात देश विदेशातील लाखो वाचकांपर्यंत पोहचू असा विश्वास व्यक्त केला.
तर मुख्य संपादक इब्राहिम अफगाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषीवलच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधत सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करु असा विश्वास व्यक्त केला. एकत्रितपणे नवीन व्हिजन काय गाठू शकतो याचा विचार करुन या असेही यावेळी त्यांनी सांगितले.