नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा सडेतोड प्रहार
| उरण | प्रतिनिधी |
पाणीटंचाईपासून ते कचऱ्याच्या ढिगांपर्यंत आणि खड्डेमय रस्त्यांपासून ते रखडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपर्यंत उरण शहर समस्यांच्या गर्तेत सापडले असून, यामागे विरोधकांचे गलिच्छ राजकारण आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा हेच प्रमुख कारण असल्याचा आरोप नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी रविवारी केला. उरण नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत येत्या आठवड्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
पत्रकारांशी संवाद साधताना नगराध्यक्षांनी विरोधकांची एकेक पोलखोल केली. शहरातील जुनी व गळकी पाईपलाईन बदलण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, कारण विरोधकांनी सभागृहात वारंवार त्याला खो घातला. याच निष्काळजीपणामुळे दररोज लाखो टन शुद्ध पाणी वाया जात असून, त्याचा थेट परिणाम शहराच्या तिजोरीवर झाला आहे. पाणी बिल दंडासह 42 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर 2 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. उद्या शहराचा वीज व पाणी पुरवठा ठप्प झाला तर त्याला सर्वस्वी विरोधकच जबाबदार असतील, असा घणाघात त्यांनी केला. विरोधकांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच गेल्या 8 ते 10 वर्षांत शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले, पावसाळ्यापूर्वी गटारांची सफाई झाली नाही आणि बहुतांश स्ट्रीटलाईट्स बंद पडल्या. याहून धक्कादायक म्हणजे गेली वीस वर्षे झाली तरी शहरातील पाण्याच्या टाक्या एकदाही साफ केल्या गेल्या नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
शहराच्या अस्मितेचा विषय असलेला राजीव गांधी टाऊन हॉल आणि वाहतूक कोंडी फोडणारा महत्त्वाचा बायपास रस्ता हे दोन्ही प्रकल्प केवळ विरोधकांच्या अंतर्गत राजकीय कुरघोडींमुळे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून रखडले आहेत. जनतेच्या सांस्कृतिक हक्कांचा गळा विरोधकांनीच घोटला आहे, असे त्या म्हणाल्या. स्वच्छतेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांचा स्वर अधिक आक्रमक झाला. कचरा संकलनाचा ठराव विरोधकांनी सभागृहात हाणून पाडल्यामुळेच आज शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावालाही विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर विरोध केल्याने तो गेली तीन वर्षे धूळ खात बंद पडून आहे.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनासोबत विरोधकही उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांसाठी सुरक्षित व सुसज्ज सार्वजनिक शौचालये आणि मुलांसाठी क्रीडांगणे विकसित करण्याचे प्रस्ताव विरोधकांनी जाणीवपूर्वक फेटाळून लावले. गेल्या 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत कागदोपत्री कोट्यवधींचा निधी मंजूर करून खर्च दाखवण्यात आला, मात्र विरोधकांनी प्रत्येक विकासकामात अडथळे आणल्याने प्रत्यक्षात जमिनीवर एकही काम दिसत नाही. याहून गंभीर बाब म्हणजे प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी विरोधकांशी हातमिळवणी करून सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा खळबळजनक आरोपही नगराध्यक्षांनी केला.
लवकरच सर्वपक्षीय जागरूक नागरिक, महिला व युवकांना सोबत घेऊन आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी आपल्या तीव्र भावना पत्रकारांन समोर व्यक्त केल्या. या पत्रकार परिषदेला नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.







