इंटरनेटसह सर्व्हर डाऊनमुळे कार्ड असतानाही पुर्ण तिकीटचा भार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एसटी महामंडळाने कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी) योजना सुरु केली. मात्र, स्मार्ट कार्ड असतानाही सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांना पूर्ण तिकीट काढावे लागत आहे. कार्डमध्ये शिल्लक रक्कम असतानाही इंटरनेट, कार्ड सिंक न होणे अशा कारणांमुळे स्मार्टकार्डचा तांत्रिक खोडा डोकेदुखी बनत आहे. स्मार्ट कार्ड येऊनही प्रवासात काहीही सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
एसटी महामंडळाने 2016 साली प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड प्रणाली केली होती. मात्र, दोन वर्षांतच ही योजना फेल ठरली. आता एसटी महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी(एनसीएमसी) स्मार्ट कार्ड देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रायगड जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रीया मार्च महिन्यात सुरु केली. जिल्ह्यामध्ये एसटी बस आगारासह खासगी कार्यालयांमध्ये स्मार्टकार्डसाठी 40 हून अधिक सेंटर उभारण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये कार्ड नोंदणीपासून कार्ड मिळविण्यासाठी कायमच गर्दी होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 30 हजार स्मार्ट (एनसीएमसी) कार्डची नोंदणी सवलतीने प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे. या स्मार्ट कार्डसाठी 199 रुपये निश्चित केले आहे. कार्ड मिळाल्यानंतर त्यात डिजीटल पद्धतीने किंवा रोखीत देऊन रक्कम जमा करावी लागते. ज्यातून सवलतीचे तिकीट वजा केले जाते. त्यामुळे एसटीच्या कॅशलेस व्यवहाराचे प्रवासी वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, स्मार्टकार्डने तिकीट काढण्यासाठी इंटरनेटची सुविधा अत्यावश्यक असते. जिल्ह्यातील दक्षिण रायगडमधील ग्रामीण व दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क विकसीत झालेले नाही. त्यामुळे या विभागातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे स्मार्ट कार्ड अडचणीचे ठरत आहे.
ग्रामीण भागात एनसीएमसी कार्ड वापरताना एसटीच्या तिकीट मशीनमध्ये बिघाड होणे, सर्व्हर डाऊन असणे आणि कार्ड सिंक न होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील प्रवाशांना बसत असून, त्यांना आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ व संबंधित प्रशासन आगामी काळात नेमकी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एसटी महामंडळाने स्मार्ट योजना सुरु करून खऱ्या अर्थाने डिजीटल कामाला गती दिली आहे. या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. मात्र, एसटीतील वाहकांकडे देण्यात आलेल्या तिकीट मशीनमधील तांत्रिक बिघाडाचा प्रश्न सतत भेडसावत आहे. त्यामुळे स्मार्ट कार्डद्वारे सवलतीमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होत आहे. एसटी महामंडळाने हा प्रश्न मार्गी लावे पर्यंत आधारकार्ड सवलतीसाठी ग्राह्य धरणे गरजेचे आहे.
अशोक पवार,
ज्येष्ठ नागरिक
प्रवाशांना स्मार्टकार्डद्वारे तिकीटची व्यवस्था व्हावी यासाठी शेवटच्या स्थानकापर्यंत प्रयत्न केले जातात. त्यामध्ये कार्डची समस्या असल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. वाहकांना रिचार्ज करण्यापासून सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सुनील चौरे,
विभाग नियंत्रक, रायगड






