| उरण | प्रतिनिधी |
न्हावा- शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरीची आणखी एक घटना समोर आली असून, बंगळुरूहून एक्स्पोर्टसाठी आणलेल्या कंटेनरमधून तब्बल 13 लाख 56 हजार रुपयांचे 1,170 लेडीज ड्रेस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
शाही एक्स्पोर्ट प्रा. लि. कंपनीचा हा माल अमेरिकेला पाठविण्यात येणार होता. ओम लॉजिस्टिक सप्लाय चेनमार्फत कंटेनर न्हावा- शेवाकडे रवाना करण्यात आला होता. मात्र, उरणमधील स्पिडी सीएफएस यार्डमध्ये तपासणी दरम्यान 197 कार्टूनमधील ड्रेस गायब असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत कंटेनर चालक केंम्पाहीय्या जी. हा कंटेनर यार्डमध्ये टाकून फरार झाल्याचे समोर आले. जीपीएस तपासणीत कंटेनर द्रोणागिरी परिसरातील भेंडखळ रोडवर काही काळ थांबला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तक्रारदार सचिन सत्यनारायण शर्मा यांच्या तक्रारीवरून न्हावा- शेवा पोलिसांनी चालक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश जयकर पाटील पुढील तपास करत आहेत.







