कशेळेतील नागरिकांचा उपोषणाचा इशारा
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत-शहापूर राज्य महामार्गाचे काँकीटीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरु आहे. अनेक ठिकाणी अपूर्ण काम असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली होती. त्यांच्याकडून दोन दिवसांत खड्डे भरून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन त्यांच्याकडून पाळले गेले नसून ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
कर्जत-शहापूर राज्य महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे याठिकाणी रोजच अपघात होत असतात. हा राज्य महामार्ग कडाव कशेळे बाजारपेठेतून जात असून याठिकाणी रस्त्याला खड्डे आणि धूळ निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील व्यापारी तसेच नागरीक धुळीने त्रस्त झाले आहेत. तसेच कडाव पेज नदीवरील पुल, वंजारवाडी फाटा, नालधे गाव व कळंब पोलीस ठाण्याजवळ प्रंचड मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत कशेळे ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली होती. त्यांच्याकडून दोन दिवसांत खड्डे भरून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन त्यांनी पाळले नाही. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव हे या रस्त्यवरून प्रवास करत असताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.9) म.रा.र.वि.महामंडळ कार्यकारी व मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे. आठ दिवसांत खड्डे न भरल्यास कशेळे परीसरातील नागरीकांना सोबत घेऊन उपोषणास बसण्याचे पत्र देखील यावेळी देण्यात आले. त्याची प्रत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.







