कामाचा दर्जा सांभाळा अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

जनतेच्या पैशातून हे विकासकाम होत आहे, त्यामुळे आपण कामाचा दर्जा सांभाळला पाहिजे. ब्रिटिशांनी बांधलेलं काम अजून टिकतं आणि आपलेच काम कसं टिकत नाही? काम चांगले झाले नाहीतर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायलादेखील मी कमी करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पालकमंत्र्यांनाच दिला. 

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्प व बीच सुशोभिकरण कामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. संघर्षाचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. कोरोना, वादळ आदी सगळी संकट असतानादेखील विकासकामांना खीळ बसता कामा नये म्हणून सरकार झटत आहे. रस्ते, दवाखाने आदी इतर सर्व विकासकामे सुरू आहेत. आता होत असलेले भूमीपूजन त्याच विकास प्रक्रियेचा भाग आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. सुरेश लाड, दाजी विचारे, नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, महंमद मेमन, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक आदी उपस्थित होते.

यापुढे बोलताना आम्हाला शेतकर्‍यांना उभे करायचं आहे, दुर्दैवाने कोकणातला शेतकरी पीक कर्ज घेत नाही. मात्र, पीक कर्जावर तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज असणार आहे. ते व्याज सरकार भरणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं. कोकणाला निसर्गाने भरभरून वरदान दिलेलं आहे. पर्यटनवाढीसाठी या ठिकाणी अमर्याद संधी आहेत. गतवर्षी पर्यटनासाठी आम्ही खूप मोठं बजेट केलं होतं, मात्र लॉकडाऊनमुळे काही करता आलं नाही. पर्यटनवाढीची या ठिकाणी खूप मोठी संधी आहे या संधीच सोन करायचं प्रयत्न आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण देखील हातभार लावलं पाहिजे. ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. 

अजितदादांना प्रीवेडींगमध्ये इंटरेस्ट 

दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन समुद्रकिनारी प्रीवेडिंग वरून पोलीस आणि पर्यटक यांच्यात झालेल्या वादाचा मुद्दा उपस्थित करत लग्न ठरल्यावर मुलं-मुली प्रीवेडिंगला श्रीवर्धनच्या भूमीत येतात आणि त्यांच्यात वाद होतात. वाद पोलीस ठाण्यात जातो. तो पोलीस ठाण्यात जाण्याचं टाळता कसं येईल याकडे स्थानिक प्रशासन व पोलीस यांनी वेधले पाहिजे. त्यांना प्रशासनाने अल्पदारात नोंदणी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना इतकी चांगली वागणूक द्या, त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे ते लग्नानंतर हनिमूनलादेखील आपल्याकडेच आले पाहिजेत. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नेहमी सहलीच्या निमित्ताने सतत पर्यटक येत राहतील आणि आपल्या पर्यटन व आर्थिक विकासाला चालना मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे विरोधकांनी अजितदादांना प्रीवेडींगमध्ये जास्तच इंटरेस्ट असल्याची खुसखुशीत टिका केली. 

झाडांसाठी लवकरच हेरिटेज

चक्रीवादळांच्या थैमानात निसर्गसंपन्न कोकणाची संपन्नताच निघून गेली आहे. असंख्य झाडे जमीनदोस्त झाली. आम्ही आता झाडाचादेखील कायदा करतोय. हेरिटेज झाड कोणालाही ऊठसूट झाड तोडता येणार नाही. स्थानिकांनीदेखील आपली नैतिक जबाबदारी म्हणून वागायला शिका. वादळात एक हजार झाडं पडली, तर त्याच्या चारपट झाडं तुम्ही लावा, अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी जनतेला केल्या. 

Exit mobile version