महामार्गाच्या भरावामुळे नदीपात्रात पिवळसर तवंग; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ नदीच्या पाण्यावरच आता प्रदूषणाचे संकट ओढवले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या माणगाव बायपासवरील पुलाच्या कामासाठी नदीपात्रात करण्यात आलेल्या भरावामुळे नदीच्या पाण्याचा रंग पिवळसर झाला असून, नदीपात्रात ठिकठिकाणी पिवळसर तवंग पसरल्याचे चित्र दिसत आहे. या गढूळ पाण्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे माणगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या बायपासचे काम सुरू असताना काळ नदीपात्रात पूल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव करण्यात आला होता. आता पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा भराव काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, भराव काढताना निर्माण होणारा गाळ आणि मातीमिश्रित पाणी नदीच्या प्रवाहात मिसळून संपूर्ण नदीपात्रात पसरत असल्याचे चित्र आहे. नदीच्या जवळच नगरपंचायतीचे जॅकवेल असल्याने हे गढूळ पाणी पाणीपुरवठ्याच्या स्रोतापर्यंत पोहोचत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
माणगाव शहरातील विविध भागांतून नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात येत असले, तरी नागरिकांच्या मनात पाण्याच्या शुद्धतेबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या नळाद्वारे येणारे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे, असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. याबाबत नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी संतोष माळी यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला गढूळ पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यात येऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नदीकाठच्या गावांना अधिक धोका
काळ नदीच्या किनारी असलेल्या उतेखोल, विद्यानगर, पोलीस स्टेशन वसाहत, खांदाड, जुने माणगाव, तीनपत्ती नाका, भादाव, बाजारपेठ, मोहल्ला आणि कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः काही भागांत थेट पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांकडून गढूळ पाण्याबाबत अधिक तक्रारी येत असल्याचे समजते. काही ठिकाणी नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्याही तक्रारी आहेत. नदीकिनारी असलेल्या काही इमारतींचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तपासणी होणे आवश्यक
महामार्गाच्या कामातून निर्माण झालेला गाळ आणि नदीत मिसळणारे सांडपाणी या दोन्ही बाबींची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. नदीचे पाणी नेमके कोणत्या कारणामुळे दूषित झाले, त्यामध्ये गाळाव्यतिरिक्त अन्य घातक घटक आहेत का, तसेच जलशुद्धीकरणानंतर नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणारे पाणी पिण्यास सुरक्षित आहे का, याची तातडीने प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपंचायतीने तातडीने ठोस पावले उचलावीत!
संबंधित ठेकेदाराकडून भराव काढण्याचे काम पर्यावरणीय नियमांचे पालन करून केले जात आहे का, याची तपासणी व्हावी. नदीपात्रात गाळ आणि दूषित पाणी मिसळण्यास प्रतिबंध करावा. नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी. तसेच पाणीपुरवठ्याची नियमित तपासणी करून नागरिकांना पाण्याच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





