‘कृषीवल’ बहुजनाचे वैचारीक भांडवल

अ‍ॅड. मानसी संतोष म्हात्रे (उपनगराध्यक्षा, अलिबाग नगरपरिषद)

कृषीवल आज 85 वर्षात पदार्पण करीत आहे. ‘कृषीवल’कार कै. अप्पासाहेब उर्फ ना.ना. पाटील यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन! कृषीवल परिवाराचे मनापासून अभिनंदन.
कृषीवल म्हणजे रायगडचे वृत्तपत्र चळवळीचा बुलंद आवाज, सामाजिक, राजकीय घटनांचा साक्षीदार आणि बदलत्या परिस्थितीचा वेगवान व अचुक ठाव घेणारा वृत्तांकनातील हिरा! रायगड जिल्ह्याचे ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय स्थान संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. 1870 पासून या जिल्ह्यात वृत्तपत्ररुपी चळवळ सुरु झाली. या जिल्ह्याचे प्रथम मराठी साप्ताहिक ‘सत्य सदन’ प्रकाशित झाले व तद्नंतर अनेक साप्ताहिके जिल्ह्यात प्रसिद्ध होत गेली. प्रत्येक साप्ताहिकाचा जन्म हा विशिष्ट विचारसरणीतून होत गेला.


तत्कालीन रायगड जिल्ह्यात सन 1932 चे सुमारास कै. ना.ना. पाटीलांचे नेतृत्वाने बहुजन, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी हितासाठी चळवळीची सुरुवात झाली होती. चरीच्या संपाने तर देशभरात वैचारीक मंथन सुरु केले होते. मात्र पुरोगामी विचारांना तत्कालीक वृत्तपत्रात कोणतेही स्थान नव्हते. रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागात जनजागृतीची नवी बीजे रुजु लागली. सामाजिक व राजकीय चळवळ बहुजन समाजाच्या हितासाठी पुढे चालु ठेवण्याकरीता आपल्या हातामध्ये वर्तमानपत्र असणे अत्यंत जरुरीचे आहे, ही काळाची गरज ओळखून कै. ना.ना. पाटलांनी मुळ स्वरुपातील कोकण कृषीवलची निर्मिती केली. खारेपाटातील शेतकरी, बहुजनांचे चळवळीतील अनेक कार्यकर्ते व सहकार्‍यांच्या साक्षीने कै. ना.ना. पाटीलांनी दि. 5 जुलै 1937 रोजी पेझारीचे सुशिला सदनच्या प्रांगणात कोकण कृषीवलचा पहिला अंक प्रकाशित केला.


तो काळ संघर्षाचा होता. लेखणीद्वारे अन्यायाला वाचा फोडणारा होता. कै. ना.ना. पाटलांच्या लढ्यात, शेतकर्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे, बहुजन समाजाचे वास्तव रुप, शासकीय पटलावर आणणारे आणि तथाकथीत पांढरपेक्षा विचारांशी फारकत घेणारे वृत्तपत्र म्हणून कृषीवल एखाद्या योध्याप्रमाणे कामगिरी करत होता. कै. ना.ना. पाटलांनी कृषीवलच्या वृत्तांमधून अनेक वैचारिक बिजे पेरली. ‘शेतकर्‍यांच्या झोपडीतून’ लेखमालेद्वारे शेतकर्‍यांचे हाल अपेष्टा व सावकारांच्या मुजोरशाहीला लगाम लावला. शासनाला बहुजनांच्या हितार्थ निर्णय घेणे भाग पाडण्यास कृषीवलमधील अनेक लेखांचा उपयोग झाला. कृषीवलच्या माध्यमातुन त्याकाळी प्रसिद्ध झालेले लेख रायगड जिल्ह्यातील विशेषत: खारेपाटातील विकासाला चालना देणारे ठरले.
‘देशाचा राज्यकारभार हाकण्याची पात्रता प्राप्त करुन देणारे शिक्षण बहुजन समाजास मिळाले पाहिजे’
‘मुंबई सरकारचे उदकदान खारेपाटाची मागणी’
‘अ‍ॅटमबॉम्ब’
‘लाख आदिवासींच्या अकरा मागण्या’ या ना अशा अनेक लेखांनी बहुजन समाजाचे हक्क व अधिकारांना मिळवण्यास कृषीवलाने मोठी साथ दिली. आज रायगड जिल्ह्याचे जे बदलते रुप आपण पाहत आहोत, त्या जिल्ह्याच्या संघर्षाचा इतिहास हा कृषीवलच्या अनेक आवृत्तीने रंगला आहे. बहुजनांचे कैवारी, रायगडचे सुपुत्र कै. ना.ना. पाटील, त्यांचे चळवळीतले सर्व सहकारी यांनी हे रोप लावले आणि अप्पासाहेबांचे एक-दोन नव्हे चौथ्या पिढीपर्यंत हे व्रत सांभाळले. अनेक राजकीय स्थित्यंतरे कृषीवलने पाहिली. कै. ना. ना. पाटील यांच्यचा पश्‍चात कै. प्रभाकर पाटील, कै. दत्ता पाटील या पिढीने कृषीवलची वैचारीक बैठक सर्वोच्च स्थानी नेली. भाई जयंत पाटील व सौ. सुप्रिया पाटील यांनी वृत्तपत्र जगतात कृषीवलला वेगळे स्थान निर्माण करुन दिले. आदरणीय मीनाक्षीताई पाटील व श्री. पंडितशेठ यांनी कृषीवलच्या पुढील जडणघडणीत नवविचार दिले.


आता कै. नाना पाटलांची चौथ्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सौ. चित्रलेखा पाटील अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत कृषीवलचा कारभार पाहत आहे. बदलत्या युगाची सार्थ प्रतिनिधी म्हणून आद कृषीवलची व्याप्ती तिने जिल्ह्याबाहेर वाढवली आहे. डिजिटल युगात क्षणाक्षणाला वेगवान आढावा घेणारे वृत्तपत्र म्हणून नव तरुणांच्या मनाचा वेध घेत आहे. रायगडच्या वृत्तपत्र जगतात मानाचे स्थान असणारे कृषीवल आज ही बहुजन सुखाय, बहुजन हिताय या भुमिकेतून उभे आहे. कै. ना.ना. पाटील, सर्व पाटील कुटुंबिय व कृषीवल परिवाराच्या या वैचारीक चळवळीस संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने पाहत आहे. आज या मंगलदिनी माझ्या कृषीवल परिवारास मनापासून शुभेच्छा व लाल सलाम.

Exit mobile version