ग्रामस्थांनी काळे-पिवळे मार्किंगचे पट्टे जाळले
| चिरनेर | प्रतिनिधी |
जमीन, घर आणि गाव वाचवा, एमएमआरडीए हटवा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी करीत शेती घरे आणि गाव वाचवण्यासाठी कोप्रोली येथील ग्रामस्थांनी तिसऱ्या मुंबईविरोधात गुरुवारी (2) पुन्हा एकदा एल्गार केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी एमएमआरडीएने कोप्रोली गावच्या वेशीवर काळे पिवळे चौकटीत मार्किंगला केलेले रंगाचे पट्टे पुन्हा एकदा पेट्रोल ओतून पेटवून देत शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
एमएमआरडीएने कोप्रोली गावच्या वेशीवर काळे 2 एप्रिल रोजी पिवळे चौकटीत मार्किंगला केले होते. गुरुवारी संतप्त झालेल्या कोप्रोली ग्रामस्थ व सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत या मार्किंगला काळे फासून निषेध केला. उपस्थितांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करीत या मार्कीगवर टायर जाळून सरकार आणि एमएमआरडीएला इशारा दिला आहे. “जमीन, घर आणि गाव वाचवा एमएमआरडीए हटवा”, “जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची” असे नारे देत शेती घरे आणि गाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार एल्गार केला आहे.
यावेळी एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी सरकारने तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादनाच्या शासन निर्णयाची माहिती दिली. सरकारचे धोरण फसवे आणि शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये. शेतकऱ्यांनी संघटीत राहून संघर्ष केला नाही तर भविष्यात आपली मूळ गावठाणाबाहेरील घरेही बेकायदेशीर ठरतील. सरकारने या सर्व घरांना सनद (प्रॉपर्टी कार्ड) देऊन सुरक्षित करावे तसेच मूळ गावठाणाबाहेर 500 मीटरपर्यंत गावठाण क्षेत्र जाहीर करावे. एमएमआरडीएने गावोगावी अशा प्रकारचे मार्किंग करून हद्दी निश्चित करत बेकायदेशीरपणे सर्वेक्षण सुरू केलं आहे. त्याला सर्वत्र विरोध होत आहे.
याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर, एड. पर्जन्य म्हात्रे, विपुल म्हात्रे, शशिकांत पाटील, प्रवीण म्हात्रे, अमेय पितळे, दिलीप म्हात्रे, हितेश म्हात्रे, अमृत म्हात्रे, निलेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, अनिकेत ठाकूर, ओमकार गावंड, हर्षद पाटील, ओंकार म्हात्रे, सौरव पाटील, नमोद म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





