कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवे, ‘निरर्थक बात’ नको

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी लढायचे असेल, तर योग्य धोरण हवे. महिन्यातून एकदा होणार्‍या ‘निरर्थक बात’ची गरज नाही, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. कोरोनाशी लढायचे असेल तर चांगली नियत, धोरण आणि निश्‍चय हवा. महिन्यातून एकदा ‘निरर्थक बात’ करण्याची गरज नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. रविवारी मोदींनी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदींची खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांच्या खात्यातील कोणताही मंत्री कोणत्याही विषयावर बोलत असतो. ती त्यांची मजबुरी आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. गेल्या सात वर्षात जे काही आपण कमावलं आहे. ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीची देण आहे. या सात वर्षात आपण राष्ट्र गौरवाचे हे क्षण एकत्र मिळून अनुभवले आहेत. आपण आपल्याच विचाराने पुढे जात आहोत. कुणाच्याही दबावात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण तडजोड करत नाही. जेव्हा आपल्या लष्कराची ताकद वाढते. तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहोत, असं वाटतं, असं मोदी म्हणाले. तसेच, आता आपला देश दुसर्‍या देशांच्या विचारांवर चालत नाही. कुणाच्याही दबावात नाही. आपण आपलेच संकल्प घेऊन पुढे जात आहोत. आता भारत आपल्याविरोधात षड्यंत्र करणार्‍यांना जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. हे पाहून अभिमानही वाटत आहे, असेही ते त्यांनी सांगितलं.

Exit mobile version