। चौल । प्रतिनिधी ।
खाकी वर्दीतील पोलीस म्हटला की जनतेच्या मनात वेगळीच भावना व्यक्त केली जात असते. मात्र, त्यांच्यातही माणुसकीचा धर्म असतो, याची प्रचिती आज रेवदंडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अमित साळुंखेच्या कार्यातून दिसून आली. इतरवेळी ज्या वर्दीचा धाक वाटतो, त्याच वर्दीतील माणसाने गरजूला केलेली आर्थिक मदत आणि योग्य समुपदेशन त्यातून खर्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडते.
पोलीस ठाण्यात लोक आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी येतात. साधारणपणे खादी वर्दीतील व्यक्तीला लोक घाबरतात. मग, तो पोलिसांचा मोठा अधिकारी असो की हवालदार… ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो. याची जाणीव रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित साळुंनेंनी करुन दिली. चौलमळा येथील ग्रामस्थांनी कृष्णादेवी मंदिरात चोरीच्या भावनेने संशयित म्हणून आढळून आलेल्या इसमास रविवारी रेवदंडा पोलीस ठाण्यात हजर केले. एकंदरीत, त्या संशयित इसमाची सद्यःस्थिती पाहता, घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याचे खाण्या-पिण्याचे हाल, कामधंदा नसल्याने हातमारी करीत होता. त्या इसमाने घरची परिस्थिती सांगताच, अमित देशमुख यांनी त्यांचे योग्य समुपदेशन केलेच; शिवाय त्याला आर्थिक मदतही केली. आणि, परत काही मदत लागल्यास हक्काने सांगा, मी मदत करेन, असे आश्वासन दिले. खरंच, पोलीस म्हटले की, मारझोड, त्यांच्या त्या आपण कधीही न ऐकलेल्या शिव्या (आरोपींसाठी) अशी प्रतिमा आपल्या मनात असते. परंतु, रेवदंडा पोलीस ठाण्याचे सर्वच कर्मचारी पोलीस दलात आपले वेगळेपण जपून आहेत. आलेल्या प्रत्येकाची योग्य विचारपूस सुरुवातीस होते, त्यामुळे पोलिसांविषयी असलेले अर्धे दडपण आधीच कमी होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेला अनुसरुन रेवदंडा पोलीस काम करीत असल्याने, ते कौतुकास पात्र आहेत.
कोरोना महामारीच्या काळात निराधारांना आधार देण्यासाठी अनेकजण पुढे येत असताना, खाकी वर्दीतील अमित साळुंखेंसारखी माणसेही कमी नाहीत. पोलीस हवालदार अमित साळुंखे यांनी जपलेला मानवतेचा हा दृष्टीकोन कौतुक करण्यासारखाच आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अशोक दुधे आणि रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी अशा पोलीस कर्मचार्यांची योग्य दखल घ्यावी. अशा पोलीस कर्मचार्यांमुळे रायगड पोलिसांच्या नावलौकिकात भर पडत आहे, हेही तितकेच खरे.