| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील खारकांड मोहल्ला येथील कवे आली कॉर्नर ते देशमुख नर्सिंग हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, नागरिकांना व वाहनधारकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. पाण्याच्या पाईपलाईनचे काम केल्यानंतर हा रस्ता नीट न बुजवल्यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात जमातुल मुस्लिमीन खारकांड मोहल्ल्याचे अध्यक्ष मुख्तार अकबर अली तरे यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी या भागात पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार आणि प्रशासनाने रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी केली नाही. पूर्वी या रस्त्यावर खड्डे होतेच, मात्र पाईपलाईनच्या कामानंतर आता हा संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, देशमुख नर्सिंग हॉस्पिटलकडे येणाऱ्या रुग्णांना आणि गरोदर महिलांना या खडतर प्रवासाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.“प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खारकांड मोहल्ल्यातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. जर या खड्ड्यामुळे एखादा मोठा अपघात झाला किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन घेणार का?” असा संतप्त सवाल जमातुल मुस्लिमीनचे अध्यक्ष मुख्तार अकबर अली तरे यांनी केला आहे. प्रशासनाने कोणताही वेळ न घालवता पुढील 4 दिवसांच्या आत हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.







