। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहर पोलिसांनी अवैधरित्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीवर धडक कारवाई केली. यात 16 बॅरलमधील अंदाजे तीन हजार लीटर गावठी दारु पोलिसांनी जप्त केली आहे.
पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुंडेवहाळ येथील कोरीपासून पुढे सुमारे 3 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या टोकावरील जंगल परिसरात अवैधरित्या गावठी दारू निर्मितीची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कारवाई पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत 16 बॅरलमधील अंदाजे तीन हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून ती जागीच नष्ट केली. तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोहवा अमोल पाटील, संदेश म्हात्रे, मिथुन भोसले, विशाल दुधे, सचिन कोर, किरण कराड आदींच्या पथकाने केली आहे.






