गॅससाठी तब्बल 45 दिवस प्रतीक्षा; गृहिणींचा संताप उसळला
| उरण | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा डळमळीत झाल्याचा फटका आता थेट ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांना बसू लागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने गावागावात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. गॅससाठी तब्बल 45 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने गृहिणींचा संयम सुटू लागला असून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या शहरी भागात साधारण 30 दिवसांच्या आत गॅस सिलिंडर मिळत असताना, ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र 45 दिवसांपर्यंत वेटिंग असल्याचे वास्तव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम ग्रामीण भागातील वितरण व्यवस्थेवर होत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत जवळपास संपुष्टात आली होती. मात्र, आता गॅस वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना पुन्हा चुली पेटवण्याची वेळ आली आहे. त्यातच चुलीसाठी लागणारे लाकूडही सहज उपलब्ध होत नसल्याने गृहिणींची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सामाजिक पदाधिकारी यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळण्यास प्रचंड उशीर होत आहे.
ग्रामीण भागात 45 दिवस वेटिंग असल्याने अनेक कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान गॅस वितरक यांनी सांगितले की, सध्या गॅस पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे वेटिंग वाढली आहे. पुरवठा नियमित झाल्यानंतर ग्राहकांना वेळेत गॅस देण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, उज्ज्वला योजनेतून ग्रामीण भागात गॅस जोडण्या देऊन चुली बंद झाल्याचा सरकारचा दावा असतानाच आज पुन्हा गावागावात चुली पेटू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे गॅस टंचाईचा हा भडका लवकर शांत झाला नाही, तर ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांमध्ये पुन्हा ‘चुलीचा काळ’ परत येणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल 45 दिवस वाट पाहावी लागते. गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागतो; पण चुलीसाठी लाकूडही मिळत नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
राजश्री पाटील
गृहिणी







