कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा निर्णय; कुंबळे, द्रविड, शांता रंगस्वामी यांचा सन्मान
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटच्या आजपर्यंतच्या इतिहासात अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला आहे. आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची नावे देशातील विविध स्टेडियममधील स्टँड्सला देण्यात आली आहेत. आता त्यात भारताचा महान फलंदाज माजी कर्णधार राहुल द्रविड, भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळे आणि शांता रंगस्वामी यांचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे कुंबळे आणि द्रविड या दोघांनीही भारताचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे. या तिघांचे नाव बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील स्टँड्सला देण्यात येणार आहेत. याबाबत कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने घोषणा केली असुन नुकताच त्यासंदर्भात कार्यक्रमही पार पडला. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी द्रविड बोलताना काहीसा भावूकही झाला होता. त्याने यावेळी त्याच्या वडिलांना खूप आनंद होईल, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्याने वेंकटेश प्रसादचे आभार मानताना म्हणाला की, मला माहित आहे माझ्या कुटुंबासाठी याचे महत्त्व खूप मोठे आहे. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, माझ्या वडिलांना हा खेळ खूप आवडायचा. माझ्यात खेळाची आवड रुजवण्यात त्यांनी खरोखर मोठी भूमिका निभावली. ते मला येथे खूप सामने पाहण्यासाठी घेऊन यायचे. केवळ कसोटी सामनेच नाही, तर रणजी चषक सामन्यांसाठीही घेऊन यायचे. जेव्हा मी लहान होतो, तेव्हा त्यांना जेव्हाही सुट्टी मिळायची तेव्हा ते किमान एका दिवसासाठी तरी क्रिकेटचा सामना पाहाण्यासाठी मला घेऊन यायचे. मला वाटते आज त्यांना खूप अभिमान वाटत असेल की त्यांच्या मुलाचे नाव स्टँडला देण्यात आले आहे. अनिल कुंबळे म्हणाला की, असे म्हणणे वावगे ठरणार नाही की आपल्या सर्वांच्या योगदानामुळे कर्नाट क्रिकेटला बनवले आहे. खरंतर कर्नाटक क्रिकेटने आपल्याला बनवले आहे. कोणत्या स्टँडला कोणाचे नाव, हे फार महत्त्वाचे नाही. योगदानाचा सन्मान केला जात आहे, हे अधिक खास आहे आणि ते योगदान कायमस्वरुपी स्टेडियमवर कोरले जाणार आहे.
राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे कर्नाटककडूनही एकत्र खेळले आहेत. राहुल द्रविडने 509 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 605 डावात 24,208 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 48 शतकांचा समावेश आहे. अनिक कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 956 बळी घेतले आहेत. सध्या 72 वर्षांच्या असलेल्या शांत रंगस्वामी यांनी भारतीय महिला संघासाठी 1976 ते 1991 दरम्यान 16 कसोटी आणि 19 एकदिवसीय सामने खेळल्या आहेत. त्यांनी 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.
चिन्नास्वामी स्टेडियम हे दुसरे घर होते. मी आणि अनिल कुंबळे आमच्या घरापेक्षा येथे जास्त वेळ घालवायचे. या जागेने खूप आनंद आणि कधीकधी निराशाही दिली, पण आज जे काही आहे, ते या जागेने दिले आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचेही आभार. शांता रंगस्वामी यांचेही कौतुक. त्यांच्यासोबत स्टँडला नाव मिळणे हा मोठा सन्मान आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या यशाचा पाया रचणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी त्या एक आहेत.
-राहुल द्रविड,
माजी कर्णधार तथा प्रशिक्षक,
भारत







