चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांचा धिंगाणा

दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच
| जेएनपीटी | वार्ताहर |
कोरोना संसर्गाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करून नये, असे शासनाचे आदेश असतानादेखील बंदी आणि लॉकडाऊन झुगारून रविवारी चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर या ठिकाणी मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. येथे आलेल्या पर्यटकांनी या पवित्र भूमीवर दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच टाकला आहे. याचा त्रास येथे राहणार्‍या आदिवासींना सहन करावा लागत आहे. चिरनेर जंगल सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी जंगल सत्याग्रहाच्या स्मृती म्हणून येथे एक छोटेखानी धरण बांधले आहे. लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल झाल्याचा फायदा घेत रविवारी या धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी आपल्यासोबत आणलेला खाऊ, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक असेच या परिसरात अस्ताव्यस्त फेकून दिल्याने या ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.

या धरणाजवळच आदिवासी वस्ती आहे. येथे येणारे पर्यटक आपली वाहने अस्ताव्यस्त कुठेही रस्त्यात उभ्या करून ठेवत असल्यामुळे या आदिवासींचा रस्ताच रोखला जातो. त्याचप्रमाणे या परिसरात काही मद्यधुंद पर्यटक अर्धनग्न अवस्थेत पाण्यात डूंबत असल्याने येथील आदिवासी महिलांना संकोच निर्माण होतो. दारूच्या बाटल्यांच्या काचा फोडून टाकल्यामुळे येथे खेळणार्‍या, बागडणार्‍या आदिवासी मुलांना अनेक वेळा गंभीर दुखापतीदेखील झाल्या आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीने येथे पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. सुरूवातीला काही दिवस पोलिसांनी येथून पर्यटकांना पिटाळून लावले होते. मात्र, या रविवारी कोणीही पोलीस येथे फिरकले नसल्यामुळे पर्यटकांनी येथे धिंगाणा घालून मोठ्या प्रमाणात घाण केली आहे. त्यामुळे यापुढे अक्कादेवी धरणावर अशा धिंगाणा घालणार्‍या पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करीत आहेत.

बाहेर गावातील पर्यटक येतात आणि धिंगाणा घालून कचरा करतात. अशा पर्यटकांवर पोलीस किंवा ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही, याबाबत आश्‍चर्य वाटते.

Exit mobile version