| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुका, मुरुड आणि रेवदंडा परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीप्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चौघांवर पोलिसांनी तडीपाराची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रायगड पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. रोहा पोलीस निरीक्षकांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित आरोपींना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये टिटवी-सावरोल परिसरातील काशिनाथ बाबू ढेबे (45), योगेश साहू झोरे (28), मिलिंद दामू झोरे (24) आणि बाबाराम कोंडू होगाडे (57) यांचा समावेश आहे. यापैकी तीन तरुण तर एक वृद्ध व्यक्ती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2019 ते 2025 या कालावधीत या आरोपींनी अवैध गावठी दारू तयार करून तिची विक्री केल्याचे वारंवार निदर्शनास आले होते. यापूर्वीही त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून कारवाई करूनही त्यांनी हा अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. अवैध दारूधंद्यामुळे परिसरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच समाजव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, सामाजिक अस्थिरता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला. या अनुषंगाने संबंधित आरोपींना 24 मार्च 2026 रोजी एक वर्षासाठी रायगड जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध दारू, गुन्हेगारी कृत्ये आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.






