निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हजारो लीटर पाणी वाया
| उरण | प्रतिनिधी |
प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहचावे, यासाठी शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशनच्या पाईपलाईनला उरण तालुक्यात गळती लागली आहे. कोट्यवधींच्या या योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. उरण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेचे जवळपास 10 कोटींचे कामे सुरु आहेत. योजनेचे काम हाती घेतलेल्या पन्नास टक्क्यांच्यावर गावातून प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. परंतु, प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक योजनांचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून अल्पावधीतच पाईप लाईनला गळती लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरी जल जीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जावे, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जल जीवन मिशनची कामे राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे ही कामे ही निकृष्ट दर्जा होत असून काही कामे रेंगाळत पडली आहेत. त्यामुळे घरोघरी पाणी देण्याच्या हर घर नल से जल योजनेवरून विधिमंडळात या अगोदर गदारोड झाला आहे. असे असतानाही पाईप स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे त्याचबरोबर प्लास्टो पाईपऐवजी स्वस्त कंपनीचे पाईप गावात टाकण्यात आले आहेत. तसेच खोदकामात सिमेंट काँक्रीटीकरण योग्य प्रकारे केले जात नसल्याने सहजपणे तुटत असल्याने त्याचे नुकसान होत आहे.
सध्या उरण तालुक्यातील बांधपाडा, कळंबुसरे व कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून जल जीवन मिशनची योजना चिरनेर गावातून जाणाऱ्या सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून राबविण्यात आली आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जल जीवन मिशनच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे हजारो लीटर पाणी व खर्च करण्यात येणारा निधी वाया जात आहे. तरी जल जीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







