| अलिबाग | प्रतिनिधी |
नागरिकांची सुरक्षितता, पक्षी-प्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कृत्रिम पतंग उडवण्याच्या धाग्यावर म्हणजे ‘चायनीज मांजा’वर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे.
काच किंवा धातूच्या धुळीने लेपित केलेला चायनीज मांजा वापरल्यामुळे दुचाकीस्वारांसह अनेक नागरिकांना गंभीर दुखापती होण्याचा तसेच मृत्यूचे प्रकार घडले आहेत. याशिवाय या धाग्यामुळे पक्षी आणि प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात इजा होते. हा धागा जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने पर्यावरणालाही मोठी हानी पोहोचते.
भारत सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत कृत्रिम मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर आधीच बंदी घातली आहे. विविध उच्च न्यायालयांनीही या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कोणत्याही कृत्रिम पतंग उडवण्याच्या धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक, पुरवठा तसेच वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित साहित्य जप्त केले जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश 28 फेब्रुवारी रोजी जारी झाल्यापासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, आवश्यक असल्यास तो पुढेही वाढविण्यात येऊ शकतो. हा आदेश सर्वसामान्यांच्या माहितीसाठी सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध करण्यात आला आहे.





