कुलिंग टॉवर जळून खाक; धाटाव एमआयडीसीतील घटना
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये खते उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेली ट्रान्सपोर्ट फर्टीकेम कंपनीत बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कूलिंग टॉवरला ही आग लागली असून या आगीमध्ये कूलिंग टॉवरचे आणि इमारतीवरील काही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.18) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या उंच इमारतीवरील कूलिंग टॉवरला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात काळ्या रंगाचे प्रचंड लोट पसरले होते. या धुराचा त्रास धाटाव परिसरातील गावांना व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळतात धाटाव अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली.
दरम्यान लागलेल्या आगीत कंपनीचा पुढील टॉवर पूर्णपणे जळून खाक झाला असून इमारतीवरील तांत्रिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेली नाही मात्र यामध्ये जीवितहानी झाली नसून मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये नुकताच सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या घटनेच्या माध्यमातून कारखान्यामधील सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेच घडलेल्या आगीच्या घटनेमुळे धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये खरोखरच कारखाने आणि कामगार सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. औद्योगिक वसाहतीमधील आगेच्या वाढत्या घटनांमुळे लगतच्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने या कंपन्यांच्या ऑडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही बोलले जात आहे.






