ठाण्यातील रुग्णालयात अग्नितांडव

 । मुंबई । वृत्तसंस्था ।

ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आलं.करोनाच्या दुसर्‍या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात 20 रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात 6 रुग्ण, तर इतर वार्डात 14 रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version