। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा रुग्णालयाची अक्षम्य हेळसांड सुरु आहे. कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक यांचे सातत्यपुर्ण दुर्लक्षच होत असल्याने रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत अनेक रुग्णांच्या मोठया प्रमाणावर तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर्स, कर्मचारी हे देखील त्यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असलेले रुग्ण दगावण्याची संख्या वाढत आहे. या मृत्यूला फक्त कोरोनाच नव्हे तर जिल्हा शल्यचिकित्सकांचा कारभार देखील तितकाच कारणीभुत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह डॉक्टर्स, कर्मचारी देखील नाराज आहेत.
अलिबाग या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील जनतेसाठी आधार आहेत. पोलादपूरपासून ते उरण, पनवेलमधील रुग्ण देखील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातून चांगल्याप्रकारे सेवा दिली जात होती. मात्र काही महिन्यातच जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालेल्या डॉ. सुहास माने यांनी आपल्या कामाची सुरुवातच वादग्रस्त पद्धतीने केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे रुग्णालयातील कर्मचार्यांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजीला सुुरुवात झाली. जिल्हा रुग्णालयाचा परिसर मोठया प्रमाणावर बकाल असताना आणि कोरोनाच्या दुसर्या लाटेची प्रचंड दहशत असताना या महाशयांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून आपले दालन सजवून घेतले. हाच पैसा जर रुग्णसेवेसाठी वापरला असता तर नक्कीच रुग्णांना चांगली सेवा मिळून त्यांचे प्राण वाचू शकले असते. मात्र फक्त स्वतःच्या सुखसोयींबद्दल विचार करणार्या जिल्हा शल्यचिकत्सकांनी याचा अजिबात विचार केला नाही. पुर्वीच्या प्रभारी शल्यचिकित्सकांच्या कालावधीत सुरु असलेल्या विविध योजनेतील कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेला लाभ झाला. त्यात कसलेही कर्तृत्व नसतानाही त्याचे श्रेय लाटण्याची संधी या डॉ. सुहास माने यांनी दडवली नाही.
वाढणार्या मृत्यूची चौकशी करुन कारवाई करा
जिह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 2 टक्के असताना अलिबाग तालुक्यात पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मृत्यूदर मात्र त्याहूनही जास्त असल्याचे दिसून येते. अलिबाग तालुक्यात आतापर्यंत 390 रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दगावलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असतानाच मृत्यूदर देखील मोठा होता. मात्र अलिकडच्या काळात पनवेलपेक्षा अलिबाग तालुक्यात रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या वाढत्या मृत्यूंना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या मृत्यूंची चौकशी करुन दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे.