एनएचएआयकडून पर्यायी महामार्गाचा संरेखन आराखडा तयार
। रायगड | प्रतिनिधी |
सातत्याने वाहतूक कोंडी, दरड कोसळणे, अपघात आणि धोकादायक असणाऱ्या ताम्हिणी घाटातील प्रवास सुलभ आणि सुखरूप होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) पावले उचलण्यात आली आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडून पर्यायी मार्गासाठी संरेखन आराखडा तयार करण्यात येत आहे. या पर्यायी मार्गामुळे पुणे ते कोकण प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे.
केंद्र सरकारने पुणे-चांदणी चौक-पौड-ताम्हिणी-माणगाव-दिघी बंदर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. मुंबई, पुणे रस्तेमार्गाद्वारे जाताना या मार्गाचा अधिक वापर केला जातो. मात्र, महामार्गादरम्यान ताम्हिणी घाटातील अरुंद रस्ते, तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील दरड कोसळणे यामुळे प्रवास धोकादायक झाला आहे.
मंद वाहतुकीमुळे कंटाळवाणा प्रवास होत असून, अनेकदा पावसाळ्यात वारंवार हा मार्ग बंद करण्यात येतो. या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा फटका बसत असून, अवजड वाहनांची वाहतूकही ठप्प होत असल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दिघी बंदर आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरातील औद्योगिक क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या दळणवळण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. यामध्ये एक पर्याय म्हणजे पानशेत-माणगाव-दिघी असा पूर्णपणे नवीन मार्ग विकसित करणे, ज्यामुळे सध्याच्या ताम्हिणी भागाला वगळून पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल किंवा दुसरा पर्याय म्हणजे घाट रस्त्याचे रुंदीकरण, धोकादायक वळणे कमी करणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा बांधणे.
या बोगद्यामुळे सुमारे 30 किलोमीटरपर्यंत कमी होऊ शकेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व जलद करण्यासाठी प्रयत्न आहेत, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार प्राधिकरणाकडून या मार्गावरील पर्यायी मार्गाबाबत संरेखन आराखडा तयार करण्यात येत असून, तज्ज्ञांच्या मते माणगाव-कुंभे-घोळ-पानशेत-पुणे असाही मार्ग प्रभावी ठरू शकतो, असा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे दिघी ते पुणे हे अंतर 50 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. कुंभे धरण परिसरातील काही रस्ते आणि बोगदा तयार होत असल्याने हा पर्याय व्यवहार्य ठरू शकतो. त्यामुळे या प्रस्तावांचाही विचार करण्यात येणार आहे, असेही महामार्ग प्राधिकरणाने नमूद केले.
ताम्हिणी घाटातील अवघड मार्गाऐवजी सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी पर्यायी संरेखन आराखडा केला जात आहे. यामुळे पुणे-कोकण रस्ते मार्गावरील दळणवळण यंत्रणा मजबूत होईल. तसेच, दिघी बंदराच्या विस्तारासह रायगडमधील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक प्रवाशांसह वाहतूकदारांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
संजय कदम,
प्रकल्प संचालक, एनएचएआय







