जिल्हा परिषदेच्या 164 कर्मचाऱ्यांची पुन्हा होणार तपासणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी व आरोग्य तपासणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचीदेखील तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, 164 जण संशयित दिव्यांग असल्याचा ठपका ठेवून त्यांची पडताळणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात होणार आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु करण्यात आला आहे. 40 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणे, प्रमाणपत्र नसणे, बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्यासह रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातदेखील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये 318 दिव्यांग कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे 164 दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे कर्मचारी संशयित दिव्यांग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांची पडताळणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात केली जाणार आहे. त्यांचा अहवाल या कार्यालयात पाठविण्यात आला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.






