| महाड | प्रतिनिधी |
दौलतगड प्रतिष्ठान दासगांवच्यावतीने गुरुवारी (दि.22)दुर्ग दौलतगडावर पहिल्यांदाच गणेश जन्मोत्सव सोहळा मोठ्या श्रद्धेने व जल्लोषात साजरा करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाची जाणीव म्हणून दौलतगडावर स्वच्छता मोहीम करत असतानाच आराध्य दैवत श्री गणेशाची पाषाणातील शिवकालीन मूर्ती सापडली होती. दौलतगड प्रतिष्ठान संस्थेने सापडलेल्या पाषाणातील मूर्तीची गडावर स्थापना करून एक छोटंसे मंदिर बांधले आहे. गुरूवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक, पूजन, महाआरती, सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू, तसेच स्वरांकित भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. या संगीतमय कार्यक्रमात गायन व बासरी वादनाच्या जुगलबंदीने सर्व भक्तगण या भक्तिमय वातावरणामुळे मंत्रमुग्ध झाले. दौलतगड प्रतिष्ठानच्यावतीने श्रींच्या महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. ग्रामस्थांनी पारंपरीक नृत्यकला सादर करत आपली संस्कृती जोपसली.







