| पनवेल | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनानिमित्त कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे महिला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष संमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) तिरूपती काकडे तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रेरणा कट्टे उपस्थित होते. यावेळी एकूण 110 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी आणि 42 पुरुष पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी व समस्यांबाबत माहिती घेतली आणि त्यावर आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या 13 महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसाठी प्रमुख अतिथी अशोक नंदिकुरळे (एन. अशोक) यांच्या ‘हसरी मैफिल’ या मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.







