17 रथांच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरण
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे नगरीतील सर्व नागरिकांच्या सुख-शांती-समृद्धी आणि अध्यात्म उन्नतीसाठी तसेच जीवनभर आपली कृपादृष्टी नागोठणे नगरीवर ठेवणारे नागोठणे अधिष्टाज तीर्थकर परमात्मा श्री चंद्रप्रभस्वामी दादांची 150 वर्षानंतरची नगरचर्या अर्थात मंदिरातून बाहेर आयोजित केलेली नगर प्रदक्षिणा परमपूज्य आचार्य भगवंत देवकीर्तिसूरीश्वरजी महाराज, परमपूज्य पन्यासप्रवर रत्नकीर्ति महाराज, चार गुरुदेव आणि 18 साध्वीजी भगवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.11) संपूर्ण नागोठणे शहरातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
जैन धर्मियांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या राजस्थान राज्यातील पालीताना येथे या मूर्तींची निर्मिती करण्यात आली असून त्यानंतर 1910 साली या मूर्तींची प्रतिष्ठापना नागोठणे येथील जैन मंदिरात करण्यात आली.
नागोठणे जैन मंदिरातील मूर्ती घडविण्यात आलेल्या गोष्टीला 150 वर्षे पूर्ण झाल्याने बुधवारी (दि.11)सकाळी 9 वाजता सजविलेल्या 17 रथांमधून भगवान महावीर व इतर देवतांच्या मूर्ती विराजमान करून सुरू झालेली ही नगर प्रदक्षिणा नागोठण्यातील जैन मंदिरापासून सुरू करण्यात आली. नंतर बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर, गांधी चौक, के.एम.जी. विभाग प्रवेशद्वार मार्गे पुन्हा जैन मंदिरात पोहोचल्यानंतर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास या नगर प्रदक्षिणाचा समारोप करण्यात आला.
या नगर प्रदक्षिणा दरम्यान रथांमधील विराजमान देवतांवर नागोठण्यातील सर्वच ठिकाणी तांदूळ व फुलांचा वर्षाव करण्यात आला. नगर प्रदक्षिणाच्या निमित्ताने नागोठण्यात ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच स्वागताचे बॅनरही लावण्यात आले होते. दुःख, दारिद्य्र यांचा नाश करुन सर्वांना सर्व प्रकारची भरभराटी लाभावी तसेच देवतांची कृपादृष्टी सर्वाना मिळून सर्वांना सुख-शांती लाभावी यासाठी सजवलेल्या रथांमध्ये विराजमान करण्यात आलेल्या भगवान महावीर व इतर देवतांवर जैन व इतर समज बांधवांनी पुष्पवष्टी करून देवतांचे मनोभावे दर्शन घेतले.
हा धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी जैन सकल संघ नागोठणेचे अध्यक्ष प्रकाश जैन, जुगराज जैन, किशोर जैन, नरेंद्र जैन, जैन सकल संघाचे सर्व पदाधिकारी व नागोठण्यातील जैन बांधव यांनी सहकार्य केले.