चिंचपाडा येथील नैसर्गिक नाला बुजवला
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईच्या नियोजित विकासाचा दावा करणाऱ्या सिडको प्रशासनाच्या हद्दीत चिंताजनक प्रकार समोर आला आहे. पनवेल-उरण मार्गावरील चिंचपाडा परिसरात नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणावर दगड व मातीचा भराव टाकून तो बुजवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे येत्या पावसाळ्यात चिंचपाडा व परिसरात कृत्रिम पूरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, या नाल्यालगत सिडकोमार्फत तलाव उभारण्याचे काम सुरू आहे. या कामातून निघालेली मोठ्या प्रमाणातील माती आणि दगड इतरत्र वाहून नेण्याऐवजी थेट नैसर्गिक नाल्याच्या पात्रात टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी नाल्याचा, नैसर्गिक प्रवाह मोठ्या प्रमाणात आक्रसला असून, काही ठिकाणी तो पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत आहे. या नाल्याद्वारे परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. मात्र नाला बुजवल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून ते थेट पनवेल-उरण या मुख्य मार्गावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच आसपासच्या इमारतींच्या तळमजल्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये भराव टाकणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. तरीही हा प्रकार सिडकोच्या नजरेसमोर सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन नाल्यातील भराव हटवावा आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा पहिल्याच मुसळधार पावसात चिंचपाडा परिसर जलमय झाल्यास त्याची जबाबदारी सिडको प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारावरच राहील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. “आम्ही सिडकोला कर भरतो, मग आमच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण करणारी अशी कामे का केली जात आहेत?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.






