पनवेलकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेलकरांच्या पाण्याच्या आशा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. डिसेंबर 2019 मध्ये मोठ्या अपेक्षांसह सुरू झालेली न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना (टप्पा 3) अजूनही पूर्णत्वास पोहोचलेली नाही. मार्च 2026 पर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, कामातील विलंब, प्रशासकीय अडथळे आणि समन्वयाच्या अभावामुळे आता ही योजना थेट डिसेंबर 2026 पर्यंत ढकलली गेली आहे.
या योजनेतून पनवेल महानगरपालिकेला 100 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यासाठी पालिकेने तब्बल 173 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकूण 391 कोटींच्या या प्रकल्पात सिडको, जेएनपीटी, एमएमआरडीए आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा सहभाग आहे. तरीही सहा वर्षांनंतरही योजना अपूर्णच आहे, ही बाब नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.
सध्या योजनेचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असले तरी बांधकाम, यांत्रिक आणि विद्युत विभागांतील काही महत्त्वाची कामे बाकी आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी अजून किमान आठ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, पनवेल शहरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नावडे, तळोजे आणि खारघर परिसरात आधीच पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. सध्या पालिका क्षेत्रात सुमारे 30 एमएलडी पाण्याची कमतरता असून, ही तूट पुढील काही महिने नागरिकांना सहन करावी लागणार आहे.
योजनेच्या विलंबावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे आयुक्त मंगेश चितळे यांनी सभागृहात माहिती देताना काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले. एकीकडे “80 टक्के काम पूर्ण” अशी आकडेवारी दिली जात असताना, दुसरीकडे वारंवार होणाऱ्या मुदतवाढीमुळे पनवेलकरांचा संयम सुटू लागला आहे. पाणीपुरवठ्याच्या या महत्त्वाच्या योजनेची प्रतीक्षा आता आणखी एक वर्ष वाढल्याने “पाणी कधी येणार?” हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.





