। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानमधील धर्मांधांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. ही घटना पंजाब प्रांतातील भोंग शहरातील असल्याचे म्हटले जात आहे. हिंदू समुदायाने सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पंजाबमधील भोंग शहरातील गणेश मंदिरावर कट्टरतावादी धर्मांधांनी हल्ला केला. या धर्मांधानी गणेश मंदिरावर हल्ला करताना फेसबुक लाइव्हही केले होते. मंदिरातील देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याशिवाय मंदिरात असलेल्या इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली. हा हल्ला करताना धर्मांधांचा मोठा जमाव होता.
पाकिस्तानमधील हिंदू परिषद अध्यक्ष डॉ. रमेश वानकानी यांनी सुप्रीम कोर्टाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, पंजाब प्रांतातील भोंग शहरातील हिंदू मंदिरावर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर बुधवारी वातावरण तणावपूर्ण झाले होते.