नवीन बांधकाम परवानग्या स्थगित करण्याची मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी नवीन बांधकामांना परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, तळोजा आणि नावडे या भागांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वारंवार होणाऱ्या शटडाऊनमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असून, अनेक ठिकाणी अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही रहिवाशी संस्थांमध्ये तर पाणीच पोहोचत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना जलस्रोत आणि वितरण व्यवस्थेत आवश्यक वाढ झालेली नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



