। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल व उपनगरांमध्ये 14 ते 17 वयोगटातील मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. एकाच दिवशी खारघर आणि पनवेल शहर परिसरातून तब्बल सहा मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणांना कायद्यानुसार अपहरणाचा दर्जा देत पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
खारघर सेक्टर 12 येथील पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दहावीत शिकणारा त्यांचा मुलगा ‘मी घर सोडून जात आहे,’ असे सांगून घराबाहेर पडला, तो परतलाच नाही. दुसऱ्या घटनेत कोपरा गावातील सेक्टर 10 परिसरातील महिलेने चार अल्पवयीन मुलांच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल केली आहे. या मुलांचे वय 14 ते 17 वर्षांदरम्यान असून त्यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे. यातील दोन मुले भावंडे आहेत. पनवेल तालुक्यातील नेरे गावातूनही 17 वर्षांच्या मुलगा बेपत्ता आहे.






