। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल सायन महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण झाले असले तरी याठिकाणी अनेक समस्या आणि प्रश्न आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बळीराम नेटके यांच्यासह इतरांनी या विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांना साकडे घातले होते. त्यानुसार त्यांनी बैठक घेऊन याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केले होते. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पनवेल सायन महामार्गावर क्रॉसिंग मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ठिक ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले आहेत. परंतु ते वापराविना पडून आहेत. एकही भुयारी मार्ग पादचार्यांसाठी अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आजही पादचार्यांना महामार्ग ओलांडावा लागत आहे. परिणामी लहान-मोठे अपघात घडतात तर काहींचा यामध्ये बळीसुद्धा केला आहे.
रोडपाली खाडीवर असलेल्या पुलावर ज्याठिकाणी जोड आहे तेथे भेगा पडल्या आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय इतर प्रश्नांबाबत राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते बळीराम नेटके यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यानुसार या विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे आणि बैठक बोलावून चर्चा केली होती. पनवेल सायन महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खाडीपूल येथे प्रसरण सांध्यांची दुरुस्ती, भुयारी मार्ग तसेच पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी दिले होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अधीक्षक अभियंता सु. ल. टोपले, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे मुख्य अभियंता संदीप पाटील यांच्यासह खारघर येथील बळीराम नेटके, अजिनाथ सावंत, शहबाज़ पटेल, रणजीत नरुटे आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओ. डी. परदेशी, कनिष्ठ अभियंता एस. सी. हीते, एम. क्षिरसागर समाधान पडळकर तसेच राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतिश पाटील, अजिनाथ सावंत, बळीराम नेटके, प्रमोद बागल, शहबाज़ पटेल, रणजीत नरुटे, किशोर साळुंखे मनोहर सत्रे उपस्थित होते.