| पुणे | प्रतिनिधी |
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद परिसरात घडली आहे. वैष्णवी जामकर असे मृत विवाहितेचे नाव असून, लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांकडून वारंवार पैशांची मागणी करत मानसिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





